गुरुवार, २१ मार्च, २०१३

तिचं भरभरून जगणं

तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पहिल्या कि जाणवते 
आयुष्यभर फक्त प्रेमच वाटल्याच्या त्या पाऊलखुणा आहेत
तिच्यासोबत थोडाही वेळ घालवला तर 
प्रत्येकालाच असे जाणवते कि आई हि अशीच असते 

सुट्टीत गावाकडे येणारी तिची मुलं नातवंड
सगळ्या सणांहून ते दिवस तिच्यासाठी महत्वाचे असतात
तिच्या कुडीत तेव्हा हत्तीचं बळ  येतं 
सगळ्यांसाठी काय काय करू असं तिला होऊन जातं 

तिच्या प्रत्येक लेकराला काय काय आवडतं 
ते ते सारं  तिनं साठवून ठेवलेलं असतं
लेकरं  तिची मोठी झालीत तरीही  
बालपणीच्या सगळ्या  आवडी जपल्या जातात.

मुंबईच्या नातवंडानाही ती तिच्या विश्वात
अलगद घेऊन जाते
गोठ्यातल्या जनावरांच्या शेनकटलेल्या पाठीवरून
तोंडावरून हात फिरावत त्त्यांचे किती गुणगान गाते 

नातवंडांना ती जेव्हा शेतात नेते 
तिची रानाची झाडं झुडपं अन काळी मातीही 
किती सहजतेतेने ती त्यांचे गुणगान गाते 
इतक्या दिवसांनी जाऊनही ओळखतात मग तेही

तिच्या शेताची नासधूस करणारी वानरं  अन सांबरं 
भल्ली दंगा  करतात वो ..पण काय करतील 
त्याहिले पण खायाले न प्यायले पाणी पाहिजे 
म्हणत त्यांचे अस्तित्वही प्रेमाने स्वीकारते 

आम्ही धान्य निवडताना 
खड्यातूनही तिचं दाने टिपणं 
कष्टकर्याला दाण्यादाण्याची असलेली  किंमत 
न बोलताही सांगून जाणं 

विदर्भाच्या तापत्या उन्हाळ्यातही 
तिन्हीसांजेला चुलीवरच्या मडक्यावर ती 
मांडे भाजते अन आम्हा सुनांना सांगते 
शिकून घ्या न पोरीहो माह्या लेकराले मांडे लई आवडतात 

मला आठवते माझ्या अपघातात 
तिचं विना रिझर्वेशन धावत येणं 
काय झाला माय  वो म्हणत कुशीत घेणं 
बरं होईपर्यंत थकल्या हाताने सगळं करणं 

बरं  झालं माय व  देवानं एकच फळ दिलं तर
लेकच दिली तुला कारण  एकतरी माय भैण पाहिजेच
पाठीपोटावरून हात फिरवायला
जगण्याची नवी दृष्टी देऊन जाते

तिचं मुंबईत आल्यानंतर तिला 
विचारलंच कुणी आजी करमते का तुम्हाला 
तर का नाही बाप्पा जिथं आपली लेकरं तीच आपली जन्नत 
हि वाक्य खूप काही शिकवून जातात 

ती कधीच तत्वाज्ञान सांगत नाही
पण तिचं भरभरून जगणं  
जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जाते 
नकळत पुढच्या पिढीलाही सुसंस्कारित बनवून जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा