शुक्रवार, १५ मार्च, २०१३

लढ मित्रा

लढ मित्रा लढ म्हणायला 
माझे काय जाते आहे? 
कारण शिवाजी जन्माला यावा 
पण बाजूच्या घरात अशा समाजातले आम्ही 
मित्रा तू अधिकारी असलास तरीही 
सरकारी नोकरच आहेस 
पण परिघात राहूनही तू 
संविधानाची ढाल घेऊन लढतोच आहेस 
शह काटशहच्या राजकारणात तू 
नियम अधिनियमांच्या बरोबर चालतोस
कितीही शह काटशह दिले तरीही 
शेवटी तूच बरोबर असतोस 
तू ज्याही विभागात जातोस
तिथे खूप छान बदल होतात
तू तिथेही जास्त टिकत नाहीस
बदलांच्या वाऱ्यात नवा विभाग तुझ्यासाठी तयारच ठेवतात
तू हरत नाहीस थकत नाहीस 
मिठाला जागून तू तिथेही राबतोस 
जुन्या खोडांचा श्वास गुदमरला की 
पुन्हा प्रशासकीय कामाचा भाग म्हणून दुसऱ्या विभागात जातोस
असे नाही कि प्रत्येक वेळी खळखळ होतच नाही 
चार दिवस निषेध बोर्ड लागतात
पेपरातही तीव्र नाराजीच्या बातम्या येतात
पुन्हा वादळ थांबून सगळे शांत होतात
पण मित्रा तुला थांबायला वेळ कुठे आहे?
आम्ही मात्र बातमी दाखवत हा आमचा मित्र म्हणवतो
तू कसा लढतोस याच्या कहाण्या ऐकवतो 
अन तुला लढ मित्रा लढ म्हणतो
आज आम्ही कॉमनमेनच्या नावाखाली
निष्क्रिय आयुष्य जगत आहोत 
तुला मात्र लढ म्हणताना 
स्वतःची कातडी वाचवत जगत आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा