शनिवार, ३० मार्च, २०१३

मी कोण ?

आई बाबा तुमच्या वंशाचा दिवा म्हणून
किती लाड केलेत माझे
बंदूक घोडा सगळे आणून दिलेत मला
पण मी मात्र नेहमी बाहुलीतच रमलो 
  
तारुण्याच्या उंबरठ्यावर मिसरूड फुटले  
पण हे काय माझे मन आतून वेगळेच मोहरले
मर्दमित्रा,चिकण्या शब्दांनी मित्रांनी स्पर्श केला कि
वेगळीच अनुभती अंतरंगात उमटायची 


मी कोण मी कोण हे काय मन आक्रांदायच
कुणाशी बोलू कुणाला सांगू
देवा मनाचा अन शरीराचा ताळमेळच बसत नाही
जीवन हवंय पण हे शरीर का नकोय


जग वेगळं पण स्वप्न वेगळीच पडायची
भास आभासाच्या दुनियेत मी एकटाच फिरायचो
कसलं वादळ  कसलं काहूर माजलं?
कोण सांगेलकोण समजावेल  


अन एक दिवस जहर ओतलं  मित्रांनी
काय रे नामर्द आहेस का
मी काय ऐकतोयमी कोण आहे
वावटळीत मी एकटाच भिरभिरतोय    


अन एक दिवस समजले  
निसर्गाने चूक केली  
विज्ञानाने त्याला केमिकल लोच्या म्हटलं 
बाईचं मन पुरुषाच्या शरीरात अडकवलं    


देवा जीवन तर मला जगायचेय  
पण मी कोण माझे अस्तित्व काय
माझा जन्म कशासाठी 
मी कुणासाठी  अन कोण माझ्यासाठी   


किड्या मुंगीच्याही जीवनात काही अर्थ असतो  
गुन्हा केला तरी सजेनंतर गुन्हा माफ असतो  
पण मी काय गुन्हा केलाय
माझ्या जीवनाचा सारीपाट कसा आवरणार  


मानसा तू तर असे नियम बनवलेत कि  
मी कुठेच  बसत नाही  
अरे जनगणनेतहि आम्ही खूप झगडलो तेव्हा
इतर म्हणून तरी आलो    


नोकरीतही मला आरक्षण नाही  
तिथेही फक्त तो अन तीच      
जगण्याचे सगळे रस्ते तुम्ही बंद केलेत 
तरीही तुम्ही मात्र मानव मग मी कोण?   


मी कोण या वावटळीत 
सगळं गणगोत मित्र परिवार दूर झाला 
काल पर्यंतच्या ओळखीच्या नजराही 
आता परक्या झाल्या ...........परक्या झाल्या ..




.. 

गुरुवार, २१ मार्च, २०१३

तिचं भरभरून जगणं

तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पहिल्या कि जाणवते 
आयुष्यभर फक्त प्रेमच वाटल्याच्या त्या पाऊलखुणा आहेत
तिच्यासोबत थोडाही वेळ घालवला तर 
प्रत्येकालाच असे जाणवते कि आई हि अशीच असते 

सुट्टीत गावाकडे येणारी तिची मुलं नातवंड
सगळ्या सणांहून ते दिवस तिच्यासाठी महत्वाचे असतात
तिच्या कुडीत तेव्हा हत्तीचं बळ  येतं 
सगळ्यांसाठी काय काय करू असं तिला होऊन जातं 

तिच्या प्रत्येक लेकराला काय काय आवडतं 
ते ते सारं  तिनं साठवून ठेवलेलं असतं
लेकरं  तिची मोठी झालीत तरीही  
बालपणीच्या सगळ्या  आवडी जपल्या जातात.

मुंबईच्या नातवंडानाही ती तिच्या विश्वात
अलगद घेऊन जाते
गोठ्यातल्या जनावरांच्या शेनकटलेल्या पाठीवरून
तोंडावरून हात फिरावत त्त्यांचे किती गुणगान गाते 

नातवंडांना ती जेव्हा शेतात नेते 
तिची रानाची झाडं झुडपं अन काळी मातीही 
किती सहजतेतेने ती त्यांचे गुणगान गाते 
इतक्या दिवसांनी जाऊनही ओळखतात मग तेही

तिच्या शेताची नासधूस करणारी वानरं  अन सांबरं 
भल्ली दंगा  करतात वो ..पण काय करतील 
त्याहिले पण खायाले न प्यायले पाणी पाहिजे 
म्हणत त्यांचे अस्तित्वही प्रेमाने स्वीकारते 

आम्ही धान्य निवडताना 
खड्यातूनही तिचं दाने टिपणं 
कष्टकर्याला दाण्यादाण्याची असलेली  किंमत 
न बोलताही सांगून जाणं 

विदर्भाच्या तापत्या उन्हाळ्यातही 
तिन्हीसांजेला चुलीवरच्या मडक्यावर ती 
मांडे भाजते अन आम्हा सुनांना सांगते 
शिकून घ्या न पोरीहो माह्या लेकराले मांडे लई आवडतात 

मला आठवते माझ्या अपघातात 
तिचं विना रिझर्वेशन धावत येणं 
काय झाला माय  वो म्हणत कुशीत घेणं 
बरं होईपर्यंत थकल्या हाताने सगळं करणं 

बरं  झालं माय व  देवानं एकच फळ दिलं तर
लेकच दिली तुला कारण  एकतरी माय भैण पाहिजेच
पाठीपोटावरून हात फिरवायला
जगण्याची नवी दृष्टी देऊन जाते

तिचं मुंबईत आल्यानंतर तिला 
विचारलंच कुणी आजी करमते का तुम्हाला 
तर का नाही बाप्पा जिथं आपली लेकरं तीच आपली जन्नत 
हि वाक्य खूप काही शिकवून जातात 

ती कधीच तत्वाज्ञान सांगत नाही
पण तिचं भरभरून जगणं  
जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जाते 
नकळत पुढच्या पिढीलाही सुसंस्कारित बनवून जाते.

सोमवार, १८ मार्च, २०१३

मातीतले आम्ही

करपली पिकं सारी 
न्हाई जनावराले चारा 
जीव वारा हुरी व्हतो
पाहून रानच्या पाखरा 

व्हते अंगाची काहिल 
आटला गावचा पाणवठा 
न्हाई खायाले भाकर 
जीव झाला ग नकोसा 

माही लेकरं न गाय 
चार बकर्या न मोती वाघ 
कसं तगवु ग  त्याहिले
झोपडं ग माझं खाली सारं 

केला देवाले नवस 
हात जोडीले सायबाले
पाया पडले सरकारचे
भिक मागितली सावकाराले 

माही काळी माय 
भेगाळला ग जीव तिचा
आम्हीही आता किती दिस तगणार 
का जावू असेच संपून........
मातीतले आम्ही आमच्याच मातीत............ 

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

लढ मित्रा

लढ मित्रा लढ म्हणायला 
माझे काय जाते आहे? 
कारण शिवाजी जन्माला यावा 
पण बाजूच्या घरात अशा समाजातले आम्ही 
मित्रा तू अधिकारी असलास तरीही 
सरकारी नोकरच आहेस 
पण परिघात राहूनही तू 
संविधानाची ढाल घेऊन लढतोच आहेस 
शह काटशहच्या राजकारणात तू 
नियम अधिनियमांच्या बरोबर चालतोस
कितीही शह काटशह दिले तरीही 
शेवटी तूच बरोबर असतोस 
तू ज्याही विभागात जातोस
तिथे खूप छान बदल होतात
तू तिथेही जास्त टिकत नाहीस
बदलांच्या वाऱ्यात नवा विभाग तुझ्यासाठी तयारच ठेवतात
तू हरत नाहीस थकत नाहीस 
मिठाला जागून तू तिथेही राबतोस 
जुन्या खोडांचा श्वास गुदमरला की 
पुन्हा प्रशासकीय कामाचा भाग म्हणून दुसऱ्या विभागात जातोस
असे नाही कि प्रत्येक वेळी खळखळ होतच नाही 
चार दिवस निषेध बोर्ड लागतात
पेपरातही तीव्र नाराजीच्या बातम्या येतात
पुन्हा वादळ थांबून सगळे शांत होतात
पण मित्रा तुला थांबायला वेळ कुठे आहे?
आम्ही मात्र बातमी दाखवत हा आमचा मित्र म्हणवतो
तू कसा लढतोस याच्या कहाण्या ऐकवतो 
अन तुला लढ मित्रा लढ म्हणतो
आज आम्ही कॉमनमेनच्या नावाखाली
निष्क्रिय आयुष्य जगत आहोत 
तुला मात्र लढ म्हणताना 
स्वतःची कातडी वाचवत जगत आहोत.

मंगळवार, ५ मार्च, २०१३

आयुष्याच्या वळणावर

आयुष्याच्या वळणावर 
धडपडत चालताना
 धडपडता धडपडता
कधीतरी आपटतो जीव
खूप लागलं तर नाही ना
पाहत पुन्हा चालू पडतो
वाटेत सतत खाचखळगे 
अडचणी येताच राहतात 
पण चालणं कधी 
थांबत का ?
आयुष्याच्या शेवटच्या 
क्षणापर्यंत चालतच राहायचे  असते 
अडखळत धडपडत पाऊल 
नेहमी पुढेच टाकायचे असते 
आयुष्य जगताना कितीही दुखः आली तरी 
स्वप्न पाहणे का सोडायचे असते 
जीवन जगताना मरणांतिक वेदना मिळाल्या 
तरीही जगणे का सोडायचे असते .......


आई

मी आई झाले तरीही 
अजूनही आई शोधते आहे 
लेकीची स्वप्न जपतानाही 
माझ्या स्वप्नांचा शोध चालूच आहे 

माझ्या पिढीला  शिकवलं 
मातृ देव भव पितृ देव भव 
पण का नाही शिकवलं
मुलांमुळेच तुम्ही  मातृ देव भव पितृ देव भव 

जन्म देऊन उपकार केलेत तुझ्यावर 
या ओझ्याखालीच जन्म माझा चालला
उपकारांचे ओझे फेडता फेडता 
जीव मेटाकुटीस आला 

आई जन्माबरोबर संवेदनाही आहेत ग मला 
प्रत्येक कर्तव्य पार पाडताना 
एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून 
जगायचेय ग मला 

तुमच्या दृष्टीने तुम्ही बराबर असाल
परंतु माझ्या परीने मीही बरोबरच आहे
कुणालाही न दुखावता 
स्वतःचे अस्तित्व जपायाचेय मला 

पण भिती वाटते तुमचे संस्कार माझ्यात येउन 
जेव्हा माझे शरीरही गलितगात्र होईल 
लेकीलाही उपकार फेड म्हणून 
मला तगवण्यास तिचेही पंख छाटत राहील....................... 
    By Manaswi

सरकारराज

बुद्धिबळाचा पट  त्यात राजा,प्रधान
हत्ती,घोडे,प्यादे सगळेच असतात
पण त्यांना चालवणारे मात्र
बाहेरचे वेगळेच असतात  
अधिकारी कर्मचारी त्यांचे हक्क कर्तव्य
सगळेच कागदी घोडे आहेत
त्यांना चालवणारेही
कुणीतरी दुसरेच आहेत 
कुणीतरी तक्रार करतो
कुणीतरी दखल घेतो
एक मारण्याचे नाटक करतो
दुसरा रडण्याचे नाटक वठवतो
आतून मात्र त्यांचं सटेलोटं असतं मेतकुट त्यांचं आधीच जमलेलं असतं दाखवण्याचे दात वेगळेच असतात
खाण्याचे मात्र वेगळेच असतात
कागदावर दर मार्च महिन्यात
जनतेच्या हिताचे बजेट सादर होते
मात्र आधीच दारूच्या पेल्यासोबत
प्रत्येकाचे टक्केवारीचे गणित मांडलेले असते
अन मग वर्षभर सापशिडीचा खेळ
तीच कामं  वरच्या दराने सुरु होतात
जनतेची मात्र सापाच्या तोंडातून
रसातळाला घसरण सुरूच राहते  
अर्थसंकल्प,तुटीचा अर्थसंकल्प,अनुदान,कर्ज
सामान्यांना कधीच यातलं काही नाही कळत
सभावर सभा त्यात सहमती, खडाजंगी, विरोध
हातात मात्र सामान्यांच्या कधीच नाही काही पडत ...........!