रविवार, ७ एप्रिल, २०१३

जगतच राहावे..........

संथ आयुष्य जगताना 
आताशा मला कंटाळा आलाय 
असे वाटते सरळसोट मार्ग सोडून 
जरा आड वाटेने चालत सुटावे 

त्या आडवाटेलाही खूप फाटे असावेत
कोणत्याही वाटेने जावे 
प्रत्येक वाटेवरून जाताना फक्त 
जीवन जीवन अन जीवनच जगावे

खूप जगले आतापर्यंत स्वतःसाठी
आता दुसार्यान्साठीही जागून पाहावे
प्रत्येक गोष्टीत फायदा बघणारी मी 
फक्त सुख सुख अन सुख अनुभवावे

हात रक्तबंबाळ होईपर्यंत 
दुसर्याच्या वाटेतील काटे उचलतच राहावे 
जीवनाच्या अंतापर्यंत 
बस फक्त जगतच राहावे..........

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

विस्कटलेलं आयुष्य

लाखात एक देखणी अशी बाला
पाहून तिच्या रुपाला
सगळेच म्हणत लग्नाची चिंता कशाला
वाटेवरचा चोरही उचलून नेईल तिला

खरंच अघटीत घडलं
वाटेवरच्या चोरानेच उचलून नेलं
तीन मुलं होईपर्यंत
रूपाच्या तिचं खोबरं  झालं

अन एक दिवस नको तेच झालं
बाहेरचा रस्ता दाखवला नवारयाने
काखेत तीन उपाशी लेकरं
फिरत राहिली अनवाणी पायाने अन रिकाम्या हाताने

गणगोत सारं कधीच संपलं होतं
सगळं आभाळच आता फाटलं होतं
जगणं आता तिचं संपलं होतं
नशिबी फक्त मुलांसाठी कष्टनं उरलं होतं

पण ती  हरली नाही मोडली नाही
उसंत अशी तिनं घेतलीच नाही
मुलांशिवाय काही असतं हेच ती विसरली
त्यांच्यासाठीच फक्त कष्टत राहिली

केसं हि गजर मळायला असतात
वस्त्र हि कधीतरी स्वतःला नटवायलाही असतात
हसणं नटणं मुरडणं हे ही  असतं
हे सारंच  ती विसरली होती

जिभेवर तलवार नजर घारीची
चाल वाघिणीची हिंम्मत मर्दाची
यात मात्र तिचं बाईपण हरवुन गेलं
तीच मीपण सारं संपूनच गेलं

मुलही तिची कर्तबगार निघाली
स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी
तिच्या आईपणाचा आदर राखणारी
तिच्या सुखासाठी आता झटणारी

पण तिचं सारं तरुण्य प्रौढत्व
कारुण्याची झालर लेउनच जगलं
त्याचे व्रण वृधत्वावरही घाला घालताहेत
आता तिला सुखाचे लेपही नकोसे वाटताहेत

विस्कटलेले आयुष्य आता जोड म्हणताही
जोडले जात नाही
सुखाचा प्याला जवळ असून पी म्हणूनही
आता पिता येत नाही

शरीराचे रोग औषधाने बरे करता येतात
पण हृदयाच्या जखमा कधीच भरता येत नाहीत
मन उध्वस्त करण्याचे काम मात्र त्या चोख बजावतात
अन दुभंगलेपानाचे  विकार कायमचे जडवून जातात